कुणीही कोणत्याही पक्षाचे असो, पण राजकारणात वावरताना सुसंकृतपणा दाखवायला हवा. प्रत्येकाने बोलत असताना कुणाला वेदना देणारे वक्तव्य करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पातळी सोडल्याचे दिसून आले. यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. पण व्यक्त होताना समाजामध्ये सलोखा राहील, कुणाच्या भावना दुखावणार नाहीत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण मी याच विचाराचा आहे कोणी कोणत्याही राजकीय विचाराचा असो तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, एक संस्कृती आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करु नये. अशा प्रकारचे वक्तव्य हे वेदना देणारे असते. यावर देवेंद्र फडणवीस बोलतील पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचे एकमेव धोरण आहे. महायुती तीनही पक्षातील ज्या लोकांनी ते विधान केले आहे त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या विधानसंदर्भात नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे असे आमचे धोरण आहे. शिवसेनेसंदर्भात जर काही वादग्रस्त विधान झाले तर एकनाथ शिंदे बोलतील, आमच्या पक्षाकडून जर काही विधान झाले त्याची जबाबदारी माझी आहे आणि भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते? गोपीचंद पडळकर म्हणाले, जतमध्ये जयंत पाटलांनी माणसे पाठवली. गोपीचंद पडळकरांनी कोणत्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का याची माहिती घेतली. जर मी कुणाकडून पैसे घेतले असतील तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का पाहिले. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, असे वादग्रस्त विधान पडळकर यांनी केले होते. बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध- रोहित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका अत्यंत अश्लाघ्य आणि संतापजनक आहे. या माणसाला बोलताना कधीही कुठलेही तारतम्य नसते आणि भाजपाच्या वरिष्ठांच्या पाठबळाशिवाय हे शक्य नाही. कुणाच्या घरापर्यंत जाण्याचा अधिकार यांना कुणी दिला? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गाळात घालण्याचे काम करणाऱ्या या आमदाराच्या वक्तव्याचा भाजपाकडून निषेध केला जातो का, हे आता पहावे लागेल. निषेध नाही केला तर त्यांना भाजपाचीच फूस असल्याच्या आमच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. आम्ही मात्र त्यांच्या या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/1LRlyWd
राजकारणात वावरताना सुसंकृतपणा दाखवायला हवा:पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर अजित पवारांचा सल्ला, म्हणाले- अशा प्रकारचे वक्तव्य हे वेदना देणारे
September 18, 2025
0