Type Here to Get Search Results !

आता सामंजस्य सांगणारे पवार तेव्हा बैठकीला का आले नाही- भुजबळ:दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे आयोजित सर्वपक्षीय आरक्षण बैठकीकडे पवारांनी फिरवली होती पाठ

आरक्षण प्रश्नावर सामंजस्य हवे असे सांगणारे शरद पवार दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला का आले नाही, असा सवाल ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला. ओबीसी मेळाव्यासाठी आलेले भुजबळ म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीची सूचना शरद पवारांनीच केली होती. उद्धव ठाकरे सरकारमध्येही मराठा समिती होती. मार्गदर्शक शरद पवारच होते. त्या समितीत अजित पवार, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण होते. त्या वेळी मराठा समाजासाठी समिती नेमण्याची गरज होती काय, असे पवार बोलले नाही. दगडफेकीआधीच्या बैठकीला शरद पवारांचा आमदार होता भुजबळ म्हणाले, जरांगेंच्या सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरवाली सराटीतील आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग होता. जरांगेंशी बोलायला पोलिस गेले तर सकाळी बोलू, असे सांगितले. रात्री झालेल्या बैठकीस शरद पवारांचा एक अामदार उपस्थित होता. सकाळी पोलिस आल्यावर तुफान दगडफेक झाली. महिला पोलिसांना मारहाण झाली. ८४ जण जखमी झाले. शरद पवारांनी असे का झाले असे विचारायला हवे होते. पवार व उद्धव ठाकरे तेथे गेले म्हणून हा बाबा (जरांगे) मोठा झाला. पवारांची दुहेरी भूमिका चालणार नाही ओबीसी आणि मराठा समाजासाठी वेगवेगळ्या दोन उपसमित्या स्थापन करण्याची गरज होती का, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला आहे. “राज्य सरकारने दोन समाजांसाठी दोन उपसमिती नेमल्या आहेत. या दोन वेगवेगळ्या जातींच्या समित्या आहेत. एका जातीची समिती असेल तर तिथे दुसऱ्या जातीच्या समितीचा विचार होणार का? सरकारने सामंजस्य निर्माण करून दोघात एकता करायला पाहिजे होती. रास्त मागण्यांची पूर्तता कशा पद्धतीने करता येईल, यासाठी सर्वांनी पाऊल टाकले पाहिजे, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले होते. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी दुहेरी भूमिका चालणार नाही असे स्पष्ट केले. आम्ही आरक्षण वाचवण्यासाठी झगडत आहोत आमच्यामध्ये आणखी मंत्री टाका. आम्ही आमचे आरक्षण वाचवण्यासाठी झगडत आहोत आणि मराठ्यांना इथे ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण असतानाही त्यांना ओबीसीमध्ये वेगळे पाहिजे. यावरही पवारांनी बोलले पाहिजे. त्या वेळी एक भूमिका आणि या वेळी वेगळी भूमिका असे चालायचे नाही, असे ते म्हणाले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/qzZeA9s

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.