राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने शुक्रवारी रक्तरंजित बदला घेतला. पुण्यातील नाना पेठ परिसरात श्री लक्ष्मी हाउसिंग सोसायटी इमारतीच्या पार्किंगमध्ये शनिवारी रात्री पावणेआठ वाजता झालेल्या खुनी हल्ल्यात वनराज आंदेकरच्या खुनाचा मुख्य आरोपी गणेश कोमकर याच्या १९ वर्षीय मुलाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. गोविंद कोमकर असे मृताचे नाव असून त्याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेत वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. यात वनराजच्या बहिणीचा दीर असलेला गणेश कोमकर हा मुख्य आरोपी आहे. या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर गटाने रेकी करून गोविंद कोमकर याला लक्ष्य केल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. विशेष बाब म्हणजे टोळीने रेकी एका भागात केली व प्रत्यक्ष लक्ष्य दुसऱ्या ठिकाणी साधले. त्यामुळे पोलिसांनाही गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा झाला असून खून रोखण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना अपयश आले आहे. दरम्यान, पुण्यात बंडू आंदेकर टोळी विरुद्ध सूरज ठोंबरे टोळी असे वैर वाढले आहे. हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. आंदेकर टोळीने २०२३ मध्ये ठोंबरे टोळीचे शुभम दहिभाते आणि निखिल आखाडेवर नाना पेठेत हल्ला केला होता. या हल्ल्यात निखिल आखाडेकर याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ठोंबरे टोळीत संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी ठोंबरे टोळीने आंदेकर टोळीचा ‘बॅकबोन’ म्हणून ओळख असलेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या केली होती. नाना पेठेतील तालीम परिसरात वनराज यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या खुनाचा बदला घेण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात या हल्ल्यानंतर नाना पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून गुन्हे शाखेकडून या खुनाचा तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी पाठवला आहे. अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात ८ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला गेला असतानाच हा खून झाल्याने खळबळ उडाली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/mO4TE2F
पुण्यामध्ये गणेश कोमकरने केली होती वनराज आंदेकरची निर्घृण हत्या:आंदेकर टोळीकडून वर्षातच वनराजच्या खुनाचा बदला; कोमकरच्या मुलाची हत्या
September 05, 2025
0