पिंपरी -चिंचवडमध्ये गणपती विसर्जनला गालबोट लागल्याची घटना घडली. लाडक्या गणरायाला निरोप देत असताना वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये चार युवक पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित दोन युवकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रियदर्शन शाळेजवळील भामा नदीत विसर्जनासाठी गेले असताना अभिषेक संजय भाकरे (वय 21, रा. कोयाळी, ता. खेड) आणि आनंद जयस्वाल (वय 28, रा. उत्तर प्रदेश) हे दोघे पाण्यात बुडाले. त्यातील आनंद जयस्वाल याचा मृतदेह मिळून आला असून अभिषेक भाकरे याचा शोध चाकण पोलिस, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने सुरू आहे. शेलपिंपळगाव – विसर्जन करताना नदीत वाहून गेले शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भामा नदीत गणपती विसर्जनासाठी गेले असताना रवींद्र वासुदेव चौधरी (वय 45, रा. शेलपिंपळगाव) हे पाण्यात वाहून गेले. त्यांचा अद्याप शोध सुरू आहे. बिरदवडी – विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू बिरदवडी (ता. खेड) येथे विसर्जन करताना तोल गेल्याने संदेश पोपट निकम (वय 35, रा. बिरदवडी) हे विहिरीत पडून बुडाले. चाकण पोलिसांसह एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, पुढील तपासासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वारंवार सूचना देऊनही नदीपात्रात उतरण्याचे धाडस चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून अनेकदा आवाहन करूनही नागरिकांकडून नदीपात्रात उतरण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. विसर्जनाच्या उत्साहात सावधगिरीचा अभाव बळी घेत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गणेशोत्सवाचा जल्लोष साजरा करताना सुरक्षिततेच्या उपाय योजनांकडे दुर्लक्ष केल्याने या दुर्दैवी घटना घडल्या असून, पोलिसांकडून नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे की, नदी, विहिरी व तलावात स्वतः उतरून विसर्जन करू नये.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Q6zFg2X
पुण्यात गणेश विसर्जनाच्या उत्सवात हळहळ!:चाकण परिसरात चार युवक पाण्यात बुडाले; दोन मृत, दोन बेपत्ता
September 06, 2025
0