Type Here to Get Search Results !

मराठवाड्याला मराठवाडा का म्हणतात?:कसे पडले नाव? काय आहे इतिहास? वाचा भाषिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी

आता महाराष्ट्र राज्याचा भाग असलेला मराठवाडा हा प्रदेश पूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग म्हणून ओळखला जात होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी हा भूभाग स्वतंत्र होऊन भारतात समाविष्ट झाला. यंदा 17 सप्टेंबरला या घटनेला 77 वर्षे पूर्ण होऊन 78 वे वर्ष सुरू होईल. या निमित्ताने, मराठवाड्याचा इतिहास, त्याचे नाव कसे पडले, आणि तो निजामशाहीच्या जोखडातून कसा मुक्त झाला, याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात... मराठवाडा नाव कसे पडले? भाषिक-ऐतिहासिक पार्श्वभूमी शासन दरबारी असणाऱ्या नोंदीनुसार, सम्राट अशोकाच्या 16 महाजनपदांपैकी दोन महाजनपदे एक अश्मक आणि दुसरे मूलक हे गोदावरीच्या खोऱ्यात नांदणारे होते. या दोन्ही महाजनपदात बहुतांश लोकं महाराष्ट्री प्राकृत बोलणारी होती. सातवाहन राजा हाल यांनी 700 गाथा एकत्र करून संपादित केलेला 'गायासप्तशती' म्हणजेच गाथा सप्तशती ही प्राकृत मधून असलेली निर्मिती आहे. यात या गोदावरी खोऱ्यातील लोकांचे लोक जीवन प्रतिबिंबीत झाले आहे. यातून एकच ध्वनीत होते की, हा प्रदेश म्हणजे मराठीचे आद्य रूप महाराष्ट्री प्राकृत बोलणारा प्रदेश. पुढे अनेकांनी या प्रदेशावर आपली हुकूमत गाजवली. 1724 मध्ये दिल्लीचा सुभेदार निजाम उल मुल्क या निजामशहाने हैदराबादमध्ये निजामशाही स्थापन केली. या निजामशाहीत तीन भाषा बोलणारे प्रदेश होते. एक तेलगू (आंध्र), कन्नड (कर्नाटक) आणि मराठी (मराठवाडा). म्हणजे निजामाच्या काळात भाषे प्रमाणे प्रदेशाची नावे झाली. यातील मराठी भाषिक पट्ट्याला 'मराठवाडा' (मराठ + वाडा/भाग) अशी प्रचलित संज्ञा मिळाली आणि ती प्रशासन, महसूल व लोकप्रिय वापरात कायम झाली. पूर्वप्रचलित शब्दरूप आणि उल्लेख काही जुन्या नोंदींमध्ये “मराठवाडी/मरहटवाडी” असा शब्दप्रयोग दिसतो, जो पुढे 'मराठवाडा' या अधिक परिष्कृत रूपात रूढ झाला. फारशी-पर्शियन इतिहासग्रंथ, निजामकाळातील कागदपत्रे आणि प्रांतीय गॅझेट्समध्ये हा भाषिक पट्टा म्हणून निर्देश आढळतो. 18व्या-19व्या शतकात निजामकाळातील महसूल-विभागणी, आणि पुढे 1860 च्या दशकानंतरच्या प्रशासकीय सुधारणांमध्ये 'मराठवाडा' ही संज्ञा दस्तऐवजांत दिसू लागते. 1956 च्या राज्यपुनर्रचनेत हा 'मराठवाडा विभाग' म्हणून बॉम्बे राज्यात समाविष्ट झाला; 1960 नंतर महाराष्ट्रात हा विभाग अधिकृतरीत्या त्या नावानेच ओळखला गेला. मराठवाडा शब्दाचा अर्थ व व्युत्पत्ती 'वाडा/वाड' हा शब्द मराठीत भाग/पट्टा/वस्ती अशा अर्थांनी येतो; 'मराठ'/'मराठी' + 'वाडा' म्हणजे मराठी लोकांचा भाग/पट्टा असा सरळ अर्थ लागतो. त्यामुळे 'मराठवाडा' ही भाषिक-प्रादेशिक ओळख दर्शवणारी संज्ञा आहे, जी लोकवापरातून प्रशासकीय वापरात स्थिरावली. आजचा वापर 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, लातूर, परभणी, नांदेड, जालना, हिंगोली, धाराशीव (उस्मानाबाद) हे जिल्हे मिळून आजचा मराठवाडा झाला. 'मराठवाडा' हा शब्द आज सांस्कृतिक, भाषिक आणि प्रशासकीय या तिन्ही पातळ्यांवर मान्यताप्राप्त प्रादेशिक ओळख आहे. मराठी बोलीभाषेची छटा, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक अनुभव यांमुळे हे नाव केवळ भूभाग नव्हे तर एक सांस्कृतिक ओळख सूचित करते. मराठवाड्याचा इतिहास थोडक्यात प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ आणि मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी आपल्या लेखात म्हटले की, पुरातत्वज्ञांच्या मतानुसार, मराठवाड्यात मानवाची वस्ती सुमारे 70 हजार वर्षांपासून आहे. 1865 मध्ये वायने या भूगर्भशास्त्रज्ञाला पैठणजवळ मुंगी येथे मध्यपराश्मयुगीन दगडी हत्यारे मिळाली. महाराष्ट्रात मिळालेली ही पहिली अश्मयुगीन हत्यारे होत. मानवाने स्थिर जीवनास प्रारंभ केला, तेव्हापासून मराठवाड्यात त्याचे अस्तित्व आढळते. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्याची वस्ती श्रीज्ञानेश्वरांच्या जन्मगावी आपेगाव येथेच पुरातत्वज्ञांना आढळून आली. उत्खननात तेथे ताम्रपाषाणयुगीन घरांचे अवशेष, रंगीत खापरे, धान्ये आणि दगडी हत्यारे मिळाली. या वस्तीचा काळ इ. स. पू. 1564 असा कार्बन-14 पद्धतीने ठरविण्यात आला आहे. पुराणातील वर्णनानुसार मराठवाड्याच्या काही भाग नंदांच्या साम्राज्यात असावा असे दिसते. नव-नंदडेरा म्हणजे नांदेड असेही मानले जाते. ज्ञानकोशकारांच्या मते पैठण ही त्यांची दक्षिणेकडील राजधानी होती. पुढे अशोकाच्या लेखातून पेतनिकांचा म्हणजेच पैठणवासियांचा उल्लेख आढळतो. मराठवाड्याला महत्व आले ते सातवाहन वंशाच्या कारकीर्दीत. दक्षिणेतील पहिल्या व मोठ्या साम्राज्याची राजधानीच पैठण (प्रतिष्ठान) येथे होती. या राजकुलाने मराठवाड्याला राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत स्थान मिळवून दिले, तसेच साहित्यात आणि कलाक्षेत्रात मोलाची कामगिरी करण्यास प्रवृत्त केले. पैठण, तेर, भोकरदन ही गावे या काळातच भरभराटीस आली. अजिंठा येथील पहिल्या गटातील व पितळखोरे येथील लेणी याच काळातील होत. गौतमीपुत्र सातकणींने नहपान आणि कर्दमकासारख्या शत्रूंना पराभूत करून महाराष्ट्राला वाचविले. हाल या राजाने गाथासप्तशतीसारखा तत्कालीन लोकजीवनाचे प्रतिबिंब असलेला ग्रंथ संपादित केला. सातवाहनांनंतर मराठवाड्याच्या काही भागावर वाकाटकांनी राज्य केले त्यांच्या कारकीर्दीत अजिंठ्याच्या काही लेण्यांत चित्रकाम झाले. वाकाटकांनतर चालुक्य वंशाच्या राजांचा मराठवाड्याशी संबंध आला. त्यानंतर राष्ट्रकूट घराण्याने 744 ते 973 पर्यंत येथे राज्य केले. त्यांची एक उपराजधानी नांदेड जिल्ह्यांतील कंधार येथे होती. वेरूळ येथील अद्वितीय लेणी यांच्या कारकीर्दीत खोदली गेली. कल्याणी चालुक्याच्या काळातील शंभराहून अधिक शिलालेख नांदेड, उस्मानाबाद (आताचे धाराशिव) व परभणी जिल्ह्यांतून मिळतात. या राजांनी याच जिल्ह्यांतून कलापूर्ण मंदिरे उभारली. सहाव्या विक्रमादित्याच्या काळात विद्यास्थाने व महाघटिकस्थाने (महाविद्यालये) यांना अनुदान दिले गेले. मराठवाड्याच्या काही भागावर कलचुरींना व त्यांच्या वंशजांनी सुमारे वीस वर्षे राज्य केले, असे अभिलेख सांगतात. मराठवाड्याला यादव घराण्याच्या काळात अत्यंत महत्व आले. यादव वंशातील पाचव्या भिल्लमाने 1175 मध्ये देवगिरी येथे राजधानी हलवली आणि तेथे देवगिरी किल्ला बांधला. यादव काळात मराठवाड्याची सर्व क्षेत्रांत, विशेषत: संगीत, कला, वाङ् मय इत्यादींत, प्रगती झाली. यादवकालीन अनेक मंदिरे मराठवाड्यात असून ती हेमाडपंती या नावाने प्रसिद्ध आहेत. हेमाद्री तथा हेमाडपंत हा बहुश्रुत विद्वान यादवांच्या दरबारी होता. याने चतुर्थर्गचिंतामणी हा बृह्द् ग्रंथ लिहिला. रामचंद्र (1271 ते 1311) हा यादवांचा शेवटचा राजा मराठवाडा याच्या काळात परमोत्कर्षाला पोहोचला होता. देवगिरीच्या वैभवामुळे मोहित होऊन अल्लाउद्दीन खिल्जीने दक्षिणेवर स्वारी केली. रामचंद्र यादवला पराभव पत्करून अपमानास्पद तह करावा लागला. पुढे मलिक काफूरने देवगिरीवर आक्रमण केले. त्यात देवगिरी पडली. यादवांचे साम्राज्य लयास गेले. खिल्जीनंतर दिल्लीच्या गादीवर तुघलक आले. त्यांपैकी मुहम्मद तुघलकाने देवगिरी येथेच दिल्लीची राजधानी हलवली. देवगिरीचे नाव दौलताबाद केले. तुघलकानंतर मराठवाड्याचा बराचसा भाग बहमनी राज्यात समाविष्ट झाला. 1538 मध्ये बहमनी राज्याची पाच शकले झाली आणि मराठवाड्याचा प्रदेशही आदिलशाही, इमादशाही, तुत्बशाही, बरीदशाही आणि निजामशाही यांत विभागला. पुढे 1633 मध्ये शहाजहान या मोगल राजाने दौलताबाद जिंकले. त्याचा मुलगा औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार म्हणून काही काळ येथे होता. यानंतर आसफजाही घराण्याचे म्हणजे हैदराबादच्या निजामाचे 1724 पासून मराठवाड्यावर आधिपत्य होते. हैदराबादच्या निजामशाहीचा उदय दिल्लीचा सुभेदार निजाम उल मुल्कचा कालखंड हा निजामशाहीच्या उदयाचा होता. त्या कालखंडात मराठ्यांशी कधी मैत्री, कधी तह करून तर कधी माफी मागून निजामशाही टिकून राहिली. इ.स. 1724 ते 1748 अशी 24 वर्ष ही कारकीर्द राहिली. त्यानंतर निजामाच्या वारसदारांमध्ये इ.स. 1748 ते 1762 पर्यंत वारसायुद्ध घडून आले. निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैदराबाद संस्थानचा राजा झाला. त्याने स्वत:ला निजाम अशी पदवी धारण केली. म्हणून नंतरच्या सर्व राजांना निजाम असे संबोधण्यात येते. निजाम-उल-मुल्कला मोगल सम्राटाकडून ‘आसफ जहा’ असा किताब मिळाला होता. म्हणून या घराण्याचा उल्लेख आसफ जाह घराणे असाही करण्यात येतो. निजामाशाहीने सुरुवातीपासूनच बलदंड सत्तेबरोबर मैत्री करून किंवा नमते घेऊन आपले राज्य केल्याचे दिसून येते. 18 व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात ब्रिटिशांचा दबादबा वाढायला लागला होता. हे हेरूनच निजाम अली यांनी ईस्ट इंडिया कंपनी यांच्या बरोबर 12 ऑक्टोबर 1800 मध्ये तैनाती फौजेचा करार केला. या कराराद्वारे संरक्षणासाठी इंग्रजांची फौज सिकंदराबादला कायम झाली. या कारणामुळे निजामाने हिंदुस्तानातील कोणत्याही राजाबरोबर कसलाही संबध ठेवणार नाही, हे मान्य केले. इंग्रजांना फौजेच्या खर्चासाठी कडाप्पा, कर्नुल, अनंतपुर व बेल्लारी हे जिल्हे निजामाने ईस्ट इंडिया कंपनीला दिले. या करारामुळे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत बंडखोरापासून पूर्ण रक्षण करण्याची जबाबदारी कंपनीने स्वत:वर घेतली.या करारापासुन हैदराबादच्या निजामाचे स्वातंत्र्य नष्ट झाले. निजामअली नंतर (सन 1763 ते 1803) निजाम सिकंदरशहा (सन 1803 ते 1829), नासिरदौला (सन 1829 ते 1857), अफजूदौला (सन 1857 ते 1869), महेबुब अली खान (सन 1869 ते 1911) यांनी राज्य केले. मीर उस्मान अलीची कारकिर्द (इ.स. 1911 ते 1948) सातवा व शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान 29 ऑगस्ट 1911 रोजी सत्तेवर आला. पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना पैसा, सैन्य,वस्तू यांची भरपूर मदत केली. युद्धातील मदतीचे बक्षीस म्हणून ब्रिटीश सम्राट पाचवा जॉर्ज ह्याने निजामाला ‘हिज एक्झाल्टेड हायनेसस’ असा किताब दिला. निजाम मीर उस्मान अली खूप महत्वकांक्षी होता. स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन करण्याचे त्याचे स्वप्न होते. हैदराबाद राज्यात राजभाषा फारशी होती. मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळ जुलूम जितका वाढतो, तितकी प्रतिकाराची ठिणगी तेजाळते. 1930-40 च्या दशकात भारतीय स्वातंत्र्याची हवा निजामशाहीत पोहोचली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी जसे नेतृत्व केले, त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. 1938 मध्ये स्थापन झालेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसने या लढ्याची सूत्रे हाती घेतली. जनतेमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यासाठी सत्याग्रह, मोर्चे आणि आंदोलने सुरू झाली. यात गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, बाबासाहेब परांजपे यांसारख्या अनेक नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रझाकारांकडून संस्थांनातील नागरिकांवर, स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्यांवर, भारतीय सीमेवरील चौक्यांवर आणि तेथील खेड्यांवर हल्ले करून रझाकारांनी सर्वत्र विध्वंस व प्रचंड रक्तपात सुरू केला. या सर्व अत्याचारांना निजामाची मूक संमती होती. हैदराबाद संस्थानातील जनतेच्या मागणीकडे निजाम दुर्लक्ष करत होता. त्यांना भारतात सामील होण्याऐवजी स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहायचे होते. यासाठी त्यांनी पाकिस्तानची मदत घेण्याचा प्रयत्न केला. ऑपरेशन पोलो, निजामाविरुद्ध पोलिस कारवाई निजामाचे मनसुबे पाहून भारत सरकारने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या जुलमी राजवटीला संपवण्यासाठी 'पोलिस कारवाई' सुरू करण्याचा आदेश दिला. हैदराबाद संस्थांनावरील लढाईची ही योजना 'ऑपरेशन पोलो' या सांकेतिक नावाने ओळखली जाते. भारतीय सेनेच्या सदर्न कमांडचे प्रमुख जनरल गोडार्ड यांनी ही योजना तयार केली. मात्र, नंतर ते निवृत्त झाले आणि त्यांच्याजागी लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंग यांची नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरल जयंत चौधरी, मेजर जनरल डी. एस. ब्रार, मेजर जनरल ए. ए. रुद्र, ब्रिगेडीयर शिवदत्त सिंग आणि एअरव्हाईस मार्शल मुखर्जी यांनी ही योजना राबवली व पूर्णत्वाला नेली. मुख्य लढाई पहिल्या आर्म्ड डिव्हिजनने सोलापूर येथे सुरू केली. सोलापूर ते हैदराबाद असा लढाईचा मार्ग होता. या मुख्य लढाईचे नेतृत्व मेजर जनरल जयंत चौधरी यांनी केले. दुसरी आघाडी विजयवाडा मार्गे होती. तिचे नेतृत्व मेजर जनरल ए. ए. रुद्र हे करत होते. त्याशिवाय कर्नुल, आदिलाबाद, चाळीसगावमार्गे, औरंगाबादकडून वाशीम मार्गे, हिंगोलीतून बुलढाणामार्गे, जालन्यातून, सोलापूरमार्गे उस्मानाबाद लातूरकडून, गदग - रायपूरकडून अशा निरनिराळ्या ठिकाणांहून भारतीय फौजा हैदराबाद संस्थानात घुसल्या. 13 सप्टेंबरच्या पहाटेपासून भारतीय फौजांनी आत्मविश्वासाने कारवाई सुरू केली. पोलिस ॲक्शनमुळे जनरल अल इद्रिस यांच्या नेतृत्वाखाली निजामी सैन्याची अक्षरशः वाताहत झाली. पोलिस ॲक्शनची कार्यवाही 17 सप्टेंबर, 1948 पर्यंत चालू राहिली. पोलिस ॲक्शननंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामाची सांगता झाली. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा जनतेच्या सामर्थ्यांचा अभूतपूर्व असामान्य विजय समजला जातो. 17 सप्टेंबर 1948 रोजी मीर उस्मान अली याने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली. म्हणून हा दिवस खऱ्या अर्थाने मराठवाड्याचा मुक्तीदिन आणि भारतीय संघराज्यात सामिल होण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PjydBno

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.