मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरसंकटाचा मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र सरकारने १५६६.४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत केंद्राची ही दुसऱ्या टप्प्यातील मदत आहे. अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांची तत्काळ मदत आणि पुनर्वसनाच्या कार्यात हा निधी दिलासा देणारा ठरणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी चालू आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यासाठी एसडीआरएफच्या केंद्रीय वाट्यातील दुसरा हप्ता म्हणून एकूण १,९५०.८० कोटी रुपये आगाऊ मंजूर करण्यास मान्यता दिली. यात महाराष्ट्रासाठी १,५६६.४० कोटी रुपये आणि कर्नाटकसाठी ३८४.४० कोटी रुपयांचा समावेश आहे, असे गृहमंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित राज्यांना सर्वतोपरी मदतीस कटिबद्ध आहे, असेही यात नमूद केलेले आहे. चालू वर्षी राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीएमएफ) मधून २१ राज्यांना ४,५७१.३० कोटी, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीएमएफ) मधून ९ राज्यांना ३७२.०९ कोटी रुपये देण्यात आले. मदतीसाठी महाराष्ट्रासह ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एनडीआरएफची सर्वाधिक १९९ पथके तैनात करण्यात आली होती. सरकार आपत्तीकाळात लोकांसोबत उभे : अमित शाह गृहमंत्री शाह यांनी आपल्या एक्स खात्यावरूनही मदतनिधीविषयीची माहिती दिली. “मोदी सरकार आपत्ती आणि त्यानंतरच्या काळात लोकांसोबत उभे आहे. १९५०.८० कोटी रुपयांचा आगाऊ निधी अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी केला जाईल. या वर्षी केंद्राने एसडीआरएफ अंतर्गत २७ राज्यांना १३,६०३.२० कोटी रुपये आणि एनडीआरएफ अंतर्गत १५ राज्यांना २१८९.२८ कोटी रुपये जारी केले,’ असे शाह म्हणाले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/uQrnPRw
महाराष्ट्रातील अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून 1,566 कोटींचा निधी मंजूर:गृहमंत्रालयाकडून कर्नाटक राज्यालाही 384 कोटींची मदत जाहीर
October 19, 2025
0