पुण्यातील टिळक रस्ता येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. वाडिया महाविद्यालयाबाहेर लावलेल्या विविध फलकांवरून सुरू झालेल्या वादामुळे हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या राजकीय स्टंटबाजीचा अभाविपने तीव्र निषेध केला आहे. अभाविप पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हाणकर यांनी सांगितले की, मनविसे स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असे प्रयत्न करत आहे.बाहेगव्हाणकर यांच्या मते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य महाराष्ट्रभर आणि देशभरात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ज्ञात आहे. पुण्यामध्ये ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अभाविपची अधिकृत सदस्यता स्वीकारली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परिसरात कोणतीही समस्या उद्भवल्यास अभाविपचे कार्यकर्ते नेहमीच ती सोडवण्यासाठी कटिबद्ध असतात. मात्र, स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या पक्षांनी चर्चेत राहण्यासाठी स्टंटबाजी करत अभाविप कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत मनविसेच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. या संपूर्ण प्रकरणात महाविद्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे, अशी मागणी अभाविपने केली आहे. ज्यांनी हे पोस्टर लावले त्यांच्यासह अभाविप कार्यालयात घुसखोरी करून हल्ला करू पाहणाऱ्या मनविसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. राधेय बाहेगव्हाणकर पुढे म्हणाले, "आमची संघटना मोठी करण्यासाठी आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत. इतरांची रेषा खोडण्याऐवजी आम्ही स्वतःची रेषा मोठी करणारे कार्यकर्ते आहोत. महाविद्यालयाबाहेर असलेल्या फलकांशी आमचा काडीमात्र संबंध नाही. अभाविप ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांची हक्काची विद्यार्थी संघटना आहे." स्वतःच्या राजकीय अस्तित्वाशी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवावी लागते, यातूनच सर्वकाही सिद्ध होते, असेही त्यांनी नमूद केले. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या हल्ल्याचा आम्ही धिक्कार करतो आणि पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/xPnzB5q
अभाविप पुणे कार्यालयावर हल्ला, टाळे ठोकण्याचा प्रयत्न:मनविसेच्या कार्यकर्त्यांकडून राजकीय स्टंटबाजीचा अभाविपने केला निषेध
October 13, 2025
0