नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला येणारे भाविक संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ, घृष्णेश्वर, पैठण या तीर्थक्षेत्रांनाही भेटी देणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विविध सुविधा निर्माण करण्यासाठी ८,७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक विकास आराखडा तयार केला आहे. उज्जैन, वाराणसीच्या धर्तीवर वेरूळचा विकास करण्यासाठी ८०० कोटी, तर पैठण, आपेगावच्या विकासासाठी सुमारे १५० कोटींचा प्रस्ताव आहे. यामध्ये काही बदल सुचवण्यात आले असून २ दिवसांत आराखडा अंतिम करून शासनाला सादर करणार असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पर्यटन विकास आराखडा सादर करण्यात आला. बैठकीस मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या काळात अंदाजे एक कोटी भाविक जिल्ह्यात येतील. त्यासाठी वाहतूक, निवास, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, अन्नछत्र, माहिती केंद्र, तंबू शिबिरे, धर्मशाळा, हॉटेल्स, लॉज, क्यूआर कोड बुकिंग सेवा, ई-रिक्षा, फेरी बसेस, बसस्थानकांवर रिअल टाइम डिस्प्ले, आपत्कालीन वाहनांसाठी राखीव मार्ग, जीपीएस युक्त पथदिवे, वाहतूक सिग्नल्स, दिशादर्शक फलक, ई-व्हेइकल चार्जिंग स्टेशन आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. महाशिवरात्रीत दररोज दीड ते दोन लाख, तर सिंहस्थ पर्वात तीन लाख पर्यटकांची अपेक्षा आहे. त्यामुळे अजिंठा, वेरूळ, पितळखोरा, घटोत्कच लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, नहर-ए-अंबरी, पाणचक्की, जायकवाडी धरण, गौताळा अभयारण्य या स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल. वाहतूक व्यवस्थेसाठी १३० हेक्टरवर पार्किंग सुविधा वाहतूक व्यवस्थेसाठी १३० हेक्टर क्षेत्रावर पार्किंग व निवास व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यासाठी धुळे-सोलापूर महामार्ग, खुलताबाद रस्ता, छत्रपती संभाजीनगर महामार्ग-५२ लगत ही ठिकाणे निवडण्यात आली आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, वन वे मार्ग, फेरी बस, ई-रिक्षा सेवा, रिअल टाइम डिस्प्ले, आपत्कालीन मार्ग, डिजिटल वाहतूक व्यवस्थापन यांचा समावेश आहे. स्वच्छतागृह, आरओ प्लँट, टँकर, प्राथमिक आरोग्य केंद्र, माहिती केंद्र, तंबू शिबिरे, धर्मशाळा दुरुस्ती, अन्नछत्र, हॉटेल्ससाठी सल्लागार सेवा, क्यूआर कोड बुकिंग सेवा यांचा आराखड्यात समावेश आहे. वेरूळला होणार हेलिपॅड सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, ड्रोन, तात्पुरत्या पोलिस चौक्या, नियंत्रण कक्ष, आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन केंद्र, आरोग्य सेवा पथके, महिला हेल्पलाइन, महिला पोलिस पथके, बॅरिकेडिंग, सेपरेशन वॉल्स, सुरक्षा मार्ग, वेरुळला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिपॅड, विश्रामगृह उभारण्यात येणार आहेत. पर्यटन नियोजनात वेरूळ लेणी व मंदिर सजावट, प्रकाशयोजना, दर्शन वेळापत्रक, बहुभाषिक माहिती, मोफत वायफाय, माहिती ॲप, पोर्टल्स, क्यूआर कोड, व्हर्च्युअल गाइड यांचा समावेश आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JGs6MgQ
संभाजीनगर पर्यटन विकासासाठी 8,719 कोटी रुपयांचा आराखडा:नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जिल्ह्यात 1 कोटी भाविक येण्याची शक्यता
October 07, 2025
0