दिवाळीला हिंदू लाेकांनी केवळ हिंदू दुकानदाराकडून खरेदी करावी, दिवाळीचा नफा केवळ हिंदूंनाच मिळाला पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी करमाळ्यात हिंदू आक्राेश माेर्चात नुकतेच केले. मात्र, याचा खरपूस समाचार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी घेतला असून आमदार जगताप यांचे वक्तव्य हे अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नाेटीस पाठवणार आहोत. पक्षाची ध्येयधाेरणे ठरलेली असताना त्यापासून कुणी वेगळे वक्तव्य खासदार, आमदार किंवा इतर जबाबदार व्यक्ती करत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ती वक्तव्ये अजिबात मान्य नाहीत. पवार म्हणाले, आमची भूमिका शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेवर अवलंबून असून त्यानुसारच पुढील वाटचालदेखील असणार आहे. खरे तर अरुणकाका जगताप त्या ठिकाणी हाेते ताेपर्यंत सर्व सुरळीत तिथे सुरू हाेते, परंतु आता काही लाेकांची जबाबदारी वाढली आहे. आपल्या वडिलांचे आपल्यावर छत्र राहिलेले नाही. त्यामुळे जबाबदारीपूर्वक आपण बाेलले पाहिजे, वागले पाहिजे हे समजायला हवे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्रित पुढे घेऊन जाणारा आहे. मागेदेखील एका कार्यक्रमात मी त्याला अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुनावले हाेते. त्याने सुधारणा करीन असे सांगितले हाेते. मात्र, त्याच्यात सुधारणा दिसत नाही. त्याचे जे काही विचार आहेत ते पक्षाला मान्य नाहीत. त्यामुळे पक्षातर्फे त्याला कारणे दाखवा नाेटीस दिली जाणार आहे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य गरजेचे नाही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या बाबतीत कुणाही मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य करणे गरजेचे नाही. शेतकरी हा लाखाचा पाेशिंदा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३१ हजार काेटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच हाेईल. राज्यातील नेते आणि मंत्र्यांनी शेतकरी तसेच कुठल्याही समाजाबाबत बोलताना भान ठेवावे, असेही पवार यांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/GMULzj7
वाद:आ. जगतापांना कारणे दाखवा नाेटीस- पवार, हिंदूंच्या दुकानातून खरेदीचे केले होते आवाहन
October 11, 2025
0