तुकडा तांदळापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्याचा मका उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कमी किमतीत मका विकावा लागत आहे. सरकारच्या आवाहनानंतर मका उत्पादन वाढवलेल्या शेतकऱ्यांवर पश्चातापाची वेळ आली आहे. २०२४-२५ च्या हंगामात मक्याला प्रति क्विंटल २,२२५ रूपये इतका हमीभाव होता. तर २०२५-२६ च्या हंगामासाठी २४०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला आहे. म्हणजे मागील हंगामापेक्षा १७५ रुपये वाढ दिली आहे. २६ डिसेंबर २०२६ रोजीच्या माहिती नुसार मक्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा ३० टक्क्यांपर्यंत कमी होता. तर हमीभावाने खेरदी वेग आलेला नाही. राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असून केवळ दोन जिल्ह्यांमध्येच प्रत्यक्ष खरेदी सुरू आहे. आतापर्यंत फक्त ६२६ टन मका खरेदी झाली आहे. जगातील मका उत्पादनाच्या तुलनेत २०२४-२५ या हंगामात मक्याच्या उत्पादनात घट झाली होती. २०२३ मध्ये १२,२८१ लाख टन मका उत्पादन असताना २०२४-२५ मध्ये १२,२०५ लाख टन एवढेच मका उत्पादन झाले. २०२५-२६ पर्यंत २०% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी तुकडा तांदळापासून इथेनॉल निर्मितीला पाठिंबा दिला आहे. इथेनॉल उत्पादनासाठी तुकडा तांदळाची राखीव किंमत वाढवून (उदा. २३२० रुपये प्रति क्विंटल) उत्पादकांना प्रोत्साहन दिले जात आहे. अन्न महामंडळाकडून अतिरिक्त तांदूळ (५.२ दशलक्ष टन) इथेनॉल उत्पादनासाठी उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राईस मिलिंग ट्रान्सफॉर्मेशन स्कीम अंतर्गत, तुकडा तांदूळ वेगळा करून तो इथेनॉल कंपन्यांना ई-लिलावाद्वारे विकला जात आहे. मका जास्त भरवशाचा, चलन वाचवतो हवामान बदलाचा मोठा फटका तांदळाला बसू शकतो. पण मका हे पीक हवामान बदलाला एवढे संवेदनशील नाही. त्यामुळे इथेनॉल उद्याोगालाही तांदळापेक्षा मका हे पीक जास्त भरवशाचे आहे. देशाच्या एकूण इथेनॉल उत्पादनात मक्यापासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलने ४५ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. एकीकडे मका देशाचे परकीय चलन वाचवत पर्यावरणाचे रक्षण करीत असून अन्नसुरक्षाही निश्चित करत आहे. असे वाढत गेले महाराष्ट्रात मका लागवडीचे क्षेत्र १९६०-६१ मध्ये खरीपात मक्याचे क्षेत्र २७००० हेक्टर, उत्पादन हेक्टरी १९००० टन, उत्पन्न प्रति हेक्टरी ६९७ किलो होते. २०२३-२४ खरीपात क्षेत्र ९,०९,००० हेक्टर, उत्पादन प्रति हेक्टरी १४,४१००० टन, उत्पन्न प्रति हेक्टरी १५८४ किलो होते. २०२४-२५ ला क्षेत्र ११,१६००० हेक्टर, उत्पादन प्रति हेक्टरी २९,९०,००० टन, उत्पन्न प्रति हेक्टरी २६८० किलो होते. २०२५-२६ च्या हंगामामध्ये खरीपामध्ये मक्याचे क्षेत्र १४,३९००० हेक्टर इतके होते. उत्पादन प्रति हेक्टरी ४२,८१,००० टन होते. तर उत्पन्न प्रति हेक्टरी २९७४ किलो इतके होते. - विजय जावंधिया, शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक उत्पादन वाढवणे गुन्हा आहे काय? ऊस, भाताच्या तुलनेत मका लागवडीत कमी पाणी वापरले जाते. त्यामुळेच सरकारने मका पिकाला प्रोत्साहन देऊन हमीभावाने खरेदी केली पाहिजे. इथेनॉल निर्मितीसाठी सरकारने एफसीआय गोडावूनमधील तांदुळ सबसिडीची गरज नव्हती. २०२४-२५ च्या हंगामात कुठल्याही शेतीमालाला हमीभाव मिळत नव्हते. तेव्हा मक्याला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाले होते. मका आयात केला होता. म्हणून यावर्षी मक्याच्या पेरा वाढला. सरकार ७१ रुपये लिटरने इथेनॉलची गॅरंटी देते तर २४०० हमीभावाने मका विकत घेण्याची गॅरंटी का देत नाही? इथेनॉलसाठी ६० लाख टन वापर सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी इथेनॉल तयार करण्यासाठी सुमारे ६० लाख टन मक्याचा वापर झाला. तेल विपणन कंपन्यांनी इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४-२५ साठी सुमारे ८३७ कोटी लिटर इथेनॉलचे वाटप केले. यात मक्याचा सर्वाधिक वाटा ५१.५२ टक्के (सुमारे ४३१.१कोटी लिटर) आहे. आता केंद्राने ऊस, भात, मक्यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रमाण ठरवून दिल्याने मका उत्पादक रडवेला झाला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JvP7RVO
तुकडा तांदळापासून इथेनॉल निर्मितीने मका उत्पादकांना फटका:2026 वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तांदळाला झुकते माप
January 12, 2026
0