सांगलीतील इनाम धामणी रोडवर शनिवारी मध्यरात्री एका बाप-लेकावर हल्ला करत मुलाच्या समोरच वडिलांना दगडाने ठेचून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कीर्तिकुमार शेडबाळे (५०) असे हत्या झालेल्याचे नाव आहे, तर हल्ल्यामध्ये मुलगा जखमी झाला आहे. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या संशयित हल्लेखोरांना संतप्त जमावाने पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये झाली असून नेमका कोणत्या कारणातून खून झाला,हे स्पष्ट होऊ शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तिकुमार शेडबाळे हे आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणी परिसरातील कच्च्या रस्त्यावरून जात होते. या वेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या तीन संशयित व्यक्तींशी त्यांचा किरकोळ वाद झाला. हा वाद क्षणातच विकोपाला गेला. संतप्त झालेल्या संशयितांनी बाप-लेकावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात कीर्तिकुमार शेडबाळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जागीच ठार मारण्यात आले, तर मुलालाही मारहाण करण्यात आली. वडिलांचा खून मुलाच्या समोरच झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हल्लेखोर नशेत असल्याचा संशय सांगली शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. अशा घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, हे तिन्ही हल्लेखोर नशेत होते का, याचाही तपास पोलिस करत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/uK4G1gz
सांगलीत मुलासमोरच वडिलांचा दगडाने ठेचून खून, तिघे ताब्यात:हत्येचे कारण अस्पष्ट, नागरिकांनी पकडून दिले पोलिसांकडे
February 01, 2026
0